Tuesday, January 11, 2011
Thursday, November 18, 2010
Tuesday, June 15, 2010
"सुहास शिरवळकर- असे आणि तसे"
पानेच्या पाने कादंबरी भरभरुन लिहिणा-या लेखकांपासून ते एकही ओळ लिहु न शकणा-या सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांशीच बोलण्याचे औत्स्युक्य या माणसांत येते तरी कोठुन...? सतत नवनवीन माणसे जोडण्याच्या उपजत कलेची देणगी सुशिंना देणारा देणगीदार एकमेव परमेश्वरच...
अनेक रहस्यकथा, सामाजिक कादंब-या, कथा, सदर, बालवाड्मय, एकांकिका, कवितासंग्रह इतकं अमाप लेखन करुनही," अहो सुशि, तुमच्या वाचक मित्रांची भुक अद्यापही भागलेली नाहीये... तेव्हा तुमच्या दारा बुलंद, फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन या मानस पुत्रांसह असंख्य वाचक वर्ग तुम्हांला हाक मारतोय. निदान "ओ" तरी द्या आणि खोटं खोटं का असेना पण मन:शांतीसाठी "परत येतोय" एवढं तरी म्हणा...... म्हणाल ना...! वाट पहातो......
तुमच्या सवयीप्रमाणे पत्राचे उत्तर नक्कीच द्याल ही आशा आहे...
Wednesday, December 16, 2009
आगळ्या प्रेमाची वेगळी कहाणी...
तिना मना जनम
एकाच वकताले झालता..
मायबाप म्हनलं,
सुगीचा वकत बी तवाच आलता...
शाया शिकाले आमी
संग संगच जायचो..
बुट्टि मारुन कधी
दिस दिसभर फिरायचो...
धाकलपनी आमी
नवरा-नवरी खेळायचो..
ती मनी नवरी
मी तिना नवरा रायचो...
तवाच मना मन मा
पयलं प्रेम खुललं..
पर म्या तिला कधी
आय लव यु नाय म्हनलं...
ती अन म्या यकदा
पिच्चरला गेलतो..
आय लव यु म्हनली
मी तर तवा पुरता मेलतो..
म्हनली, तु मना बंटी
अन् मी तुनी बबली हाय..
म्हनलं, बाप मारेल
जराशी सांभाळुनच राय...
"अरे येड्या, खोटं खोटं
पिच्चरचा डायलाग म्हनुन पायला..
मनातला किडा मात्र
शब्दाभवतीच घोळत रायला...
तिनी गाडि डिस्टिन्कशला
एका मार्काने अडली..
तवा मनी इकडं
पास व्हायची बोंब पडली...
पुढल्या शिक्षणासाठी ती
शहरामधी गेली..
खरं तर शादीची आशा
तवाच अर्धी मेली...
परत आली यकदा
कुनी साहेबही सोबत व्हता..
मले भेटाले उनती
पर मना गावामा ठिकाना नव्हता...
म्या येड्यागत आपलं
माळरानावर जाऊन बसलो..
प्रेम बिम म्हनत म्हनत
सोताच सोताशी फसलो...
शादी ले गेलो व्हतो तिच्या
आंदनात मनं मनच दिलं..
पर तवा बी तिले
आय लव यु नाय म्हनलं...
---------------मनोज
१८ नोव्हेंबर २००९
Wednesday, July 22, 2009
"दुनियादारी"
"सु.शि." म्हणजेच सुहास शिरवळकर. कित्येक तरुण वाचकांचे एक आदर्शवादी लेखक. कारण ऐन तारुण्याच्या उंबरठयावर पाऊल ठेवणा-या प्रत्येक तरुणाला वास्तववादि "दुनियादारी" ला सामोरे जावे लागत असते आणि त्या उंबरठयावर असतांना काहि तरूणांना आयुष्यभराच्या वाटचालीसाठी योग्य वाट सापडते तर काहि हिच वाट चुकतात आणि कुठेतरी दुरवर भटकत जातात. याच वयात कॉलेज जिवनात लागणा-या वाईट संगती आणि सोबत, कुणाबद्दल तरी मनात वाटणारं आकर्षण किंवा प्रेमही खुलत असतं. अशा या प्रत्येक तरूण मनाच्या आयुष्यात येणा-या एका पर्वाला सु.शिं.नी आपल्या "दुनियादारी" या कादंबरीतुन इतक्या बखुबीपणे मांडले आहे की, त्याबद्दल कितीही बोलले तरी शब्द तोकडे पडतात. हा माझा स्वानुभव आहे की, दुनियादारीची थोडिशी कल्पना कुणाला दिली तर ऐकणा-याच्या मनात त्यासंबंधी प्रचंड कुतुहल व त्याचसोबत कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि त्यानंतर सुरु होतो दुनियादारीचा शोध. प्रातिनिधीक स्वरुपातल्या कादंबरीचा अथवा वास्तवातल्या दुनियादारीचा.
प्रत्येक मुलाच्या वा मुलीच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रीणी येत असतात. परंतु त्यांची व्याप्ती किती..? असे विचारले तर ते मात्र चटकन कुणाला काही ठरविता येत नाही. अशाच प्रकारे या कादंबरीतुन अजरामर झालेला एस.पी. चा कट्टा आणि त्या कट्ट्यावरची वरकरणी टवाळ दिसत असणारी " कट्टा गँग" मनातून किती प्रेमळ आणि मवाळ आहे याचं दर्शन घडते.
या कट्टयाचे सदस्य- दिग्या (डि.एस.पी), श्रेयस, अश्क्या,
मुली- शिरीन, मिनू, सुरेखा, आशा, पुष्पा.
विरोधी पण महत्वाचे- साईनाथ, शशिकला.
आणि या व्यतिरिक्त- एम.के.क्षोत्री, रानी मां, डॅडी, धिरुभाई.
सर्वच पात्रे कशी आपल्या सभोवताली सापडणारी आहेत. त्यामुळे ही दुनियादारी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. हे सारे कसे एकसंध आणि आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देणार असे गृहितक मांडुन चाललेले."शोधा म्हणजे सापडेल" अशी एक उक्ति आहे... त्याप्रमाणे थोडया वेगळ्या स्वरूपात बोलायचे झाले तर मी म्हणेल, " पहा म्हणजे सापडेल" आपल्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्ति मधे ही पात्रे इतकी सहजपणे सापडतात... की क्षणभर तुम्हाला स्वत:ला वाटते, आपण पण ही दुनियादारीच तर जगत नाही आहोत ना....!
"शिरीन" या अनुभवसंपन्न मुलीबद्दल काय बोलावे..? कादंबरीचा हर एक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही... तिचे एक वाक्य मनाला खुपच लवकर भिडते. ती म्हणते," आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते." या वाक्यातला खोलवर असलेला विचार शिरीनच्या मुखातून निघालेला असला तरी तो मुळात सु.शिं.च्या ह्रदयातुन आलेला आहे, हे विसरुन कसं चालेल...!
एम.कें.चं जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं ते दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलणं... रानी मां म्हणजेच पुर्वीच्या मीरा सरदेसाई चं दु:ख... हे सारं मनातुन काढुन कागदावर उतरविणारे आपले सु.शि.
दुनियादारीचं सार काढुन ती कोळुन प्यायल्यास क्वचित प्रसंगी आयुष्य जगतांना कुणाला काही त्रास होईल असे मला वाटते. अन्यथा या विचारांच्या आधारे स्वत:चं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करुन घेण्यास प्रत्येक वाचकाला मदत होते.
तेव्हा अशी ही दुनियादारी प्रत्येकाने जपा, जगा. हीच एक अपेक्षा...
मित्रांनो, या कादंबरी वाचनाच्या निमित्ताने मला त्यावर सुचलेल्या काही ओळी...
दुनियादारी...
रानी मां मधील
गुढ एका आईची,
डॅडिंनी वाळीत टाकलेल्या
मुलाच्या नात्याची...
दुनियादारी...
मिनू की शिरीन...?
या पडलेल्या कोड्याची,
मोठा होऊन सुध्दा
"चाईल्ड" असणा-या श्रेयसची...
दुनियादारी...
चाकु, तलवारी, राडा
हे सारं सारं विसरुन,
प्रेमात, रांगड्या वाघाचं
मांजर झालेल्या दिग्याची...
दुनियादारी...
एका टोणग्यावर
मनसोक्त प्रेम करणा-या,
अण्णांच्या धाकामुळे
स्वप्न चुरगळणा-या सुरेखाची...
दुनियादारी...
भित्रा, घाबरट
दगाबाज अशा अश्क्याची,
अनुभव कोळुन प्यायलेल्या
प्रितम अन शिरीनची...
दुनियादारी...
मध्या, श्री, नित्या
या सा-यांच्या दोस्तीची,
हुशार अन हजरजबाबी
विनोदी कोडे घालणा-या उन्म्याची...
दुनियादारी...
संधी मिळताच गेम करणा-या
संधीसाधु साईनाथची,
वासनेपोटी माजलेल्या
गंडविणा-या शशीकलेची...
दुनियादारी...
लग्न म्हणजे पोरखेळ
समजणा-या मनीषची,
तर कॉलेजात शिकतांना
मास्तरवरच प्रेम करणा-या सुधेची...
दुनियादारी...
दु:ख दारुत बुडवून
तशीच पोटात रिचविणा-या,
भावनाशुन्य झालेल्या
महान अशा एक.के.क्षोत्रींची...
दुनियादारी...
वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या
चालत राहणारी,
सर्वांची आवडती
कधीही न संपणारी...
दुनियादारी...
दुनियादारी...
दुनियादारी...
-----------मनोज
Tuesday, July 21, 2009
कोई तो है वो...
कोई तो है वो...
मेरे लिये बहोत ख़ास है वो...
जिंदगी से ना कोई गिला
ना कोई था शिकवा..
तेरे साथ जीने के लिये
लहराती थी मुझे ये हवा...
पागल बन बैठा था तेरे लिये
और थोडा आवारा..
भूल के भी भूलना तुझे
ना था मुझे गवारा...
एक आदत सी हो गयी थी
तुम्हारा रोज सपनों मे आना..
सारे दर्द भुलाकर
मुस्कुराकर चले जाना...
काश कोई करिश्मा
फिर एक बार हो जाये..
सपनों से निकल के
कभी सामने तू आ जाये...
दिल की तमन्ना है
के तुम मेरे साथ रहो..
दिन मे हो या रात मे
देखा ये सपना काश कभी सच हो...
---------------मनोज
१८ जुलै २००९
या पावसाला काय वेड लागलंय का...?
वेळ ना काळ
केव्हाही येतो..
सकाळ ना संध्याकाळ
उगाच आपला बरसतो...
अरे,
याला कळत कसं नाही...!
ती मला भेटायला येणार होती..
वेळात वेळ काढून
निवांतपणे थांबणार होती...
ती येणार म्हंटलं की,
त्याचा कसा होतो बघा जळफळाट
त्याच्यामुळे येता आले नाही की,
तिचा घेतो मग तो तळतळाट
चिडुन नंतर ती बोलते,
याची तक्रार देवाकडे करायला हवी..
तो म्हणतो, देव तसा बाका आहे
त्याने ती ऐकायला तर हवी...
राग येतो तिला, म्हणते
हा तर खुपच निर्लज्ज आहे,
जायचे काहि नाव नाही..
फक्त इथेच बरसेल
इतरत्र याची कुठे धाव नाही...
कंटाळलेली ती,
आता मात्र जायला निघते..
म्हणते, आता बरी माझ्यापाठी
यालाही जायची लहर येते...
त्यालाही थोडी लाज वाटते..
थांबतो, बरसत रहातो निरंतर तिथेच...
सकाळ, दुपार, संध्याकाळ अन रात्रभर.....
१९ जुलै २००९
Monday, July 13, 2009
असल्या या मुंबईत...
असल्या या मुंबईत...
इकडे तिकडे न पहाता
आम्ही रस्ता ओलांडणार,
बेदरकार गाडी चालक
कुणी आम्हाला येवून धडकवणार,,
चार-आठ दिवस पलंगावर पडून
दवाखान्याचे बिल वाढवणार,,,
वाहतुकीचे नियम माहिती आहेत
तरी आम्ही सिग्नल तोडणार,
घरदार नाही म्हणुन
आम्ही फुटपाथवरच झोपणार,,
नशेबाज श्रीमंताचं पोरं एखादं
गाडीने आम्हाला चिरडत जाणार,,,
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार
आता उन होते म्हणत
धो-धो पाउस कोसळणार,
थोडया-थोडक्या पावसानेही
गटारी, नाले तुडुम्ब भरणार,,
रस्ते, गल्लीबोळातुन
घराघरातून पाणी शिरणार,,,
मुलभूत सुविधांअभावी
अनेक जीव पाण्यात जाणार,
जीव तोडून कशीबशी
मदतीसाठी हाक मारणार,,
प्रशासनाला शिव्या देत
दोन दिवसांनी घरी पोहचणार,,,
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार
प्रांतिक अन भाषिक वाद
इथे रोजच चालणार,
हाणामा-या, बंद
जाळपोळ अन दगडफेक,,
मराठी- अमराठींना
अमराठी- मराठींना मारणार,,,
गर्दीतून येणारा एक दगड
कुणाचंही डोकं फोडणार,
कुणी एक नेता
जमावाला आपल्या जाळ्यात ओढणार,,
त्यातच कुणी एक आपलं
धार्मिकतेचं पिल्लू हळूच सोडणार,,,
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार
सारे देशच जणू
मुंबईचे शत्रु,
अमेरिकन नागरिकही
इथे घरात बसून कट करणार,,
हा इथे आला कसा॥?
पोलीस शोधात वेळ घालवणार,,,
रस्ते बंद करूनही
अतिरेकी समुद्रीमार्गे येणार,
लोकल, हॉटेल, दवाखाने
यांना बॉम्बचे लक्ष्य बनवणार,,
आमचा आपला एकच प्रश्न,
आम्ही अजुन किती सहन करणार॥?
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार
----------------------------------------मनोज
१ डिसेंबर २००८
दिसं गेले, रात्र गेली...
दिसं गेले, रात्र गेली
काळ सरला सरसर,
यादरम्यान ठावुक नाही तुला
माझ्या मनाची झाली किती मरमर...
मी तुला विसरलो
असं साहजिकपणे तुला वाटलं असावं,
म्हणुन काय तू आपलं
इतके दिवस रुसावं...?
घाईगर्दीचं जीवन असतं हे
अनाहुतपणे काही गोष्टी घडतात,
चार क्षण सुखासाठी
सारेच इथे धडपडतात...
वेडाबाई कुठली,
आताशा तू खुप त्रास देतेस,
थोडा-थोड़का उरलेला
माझा जीव सुद्धा घेतेस...
पुरे झाले आता
कधी येणार आहेस ते सांग,
येतांना मात्र आपल्यासाठी
देवाकडे खुप सारं सुख माग...
--------------------मनोज
२० डिसेंबर २००८
प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं...
संतोष- संतोषी च्या जुन्या कवितेच्या संदर्भात...
प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं
बायको झाल्यापासून
भांडणे खुप वाढली आहेत,
संसाराच्या वृक्षावरील
हिरवी पाने पार झाडली आहेत,,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा...
प्रेयसी असतांना,
"तू म्हणशील तसंच होणार"
असं सारं नेहमी म्हणायची,
आता मात्र माझ्यावरंच
वेळ आली आहे रडायची,,
उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं...
प्रेयसी असतांना,
वेळ देत नाही म्हणायची
बायको म्हणुन सोबत असतांना
काय दिवे लावतेय,
"आमचं किती प्रेम आहे"
असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,,
उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा...
प्रेयसी असतांना,
माझ्याकरीता तुला
खुप गोष्टी कराव्याश्या वाटायच्या,
बायको झाल्यानंतर मात्र
कणिक तू मळायचीस
अन पोळ्या मी लाटायाच्या...?
उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायचं...
प्रेयसी असतांना,
तुला सोडुच नये असं वाटायचं
बायको झाल्यानंतर
कधी एकदाचं सोडतो असं झालंय,
कामे दोघांनी करायची असतात
पण तू माझं ओझ्याचं गाढव केलंय,,
उरलं आहे ते फ़क्त ओझं वाहता-वाहता जीव सोडायचं...
--------------------------------------मनोज
२२ डिसेंबर २००८
"मैत्री" असा एक शब्द...
"मैत्री" असा एक शब्द
"मैत्री" असा एक शब्द- त्यात
कधी प्रेमळ तर कधी
तात्विक विषयावरही
आपलं भांडण होतं
अनावश्यक वादही होतो,
एकमेकांच्या मनाला
साद घालण्यासाठी
थेट काळजापर्यंत भिडणारा
असा नादही होतो...
"मैत्री" असा एक शब्द- त्यात
आई,वडील,भाऊ, बहिण
यांची उणीव तशी
क्वचितच भासते,
असं एक नातं
जे बुडत्याला आधार
अन् मर्त्याला मिळालेले
श्वासाचं दान असते...
"मैत्री" असा एक शब्द- त्यात
अनंत काळाच्या
सोबतीचा संकल्प
दोन्ही बाजूने बिनशर्त
असा सोडायचा असतो,
सोबतीने सुरूवात केलेला
ऐन रंगात आलेला
असा एक खेळ
अर्ध्यावरती मोडायचा नसतो....
------------------मनोज...
१२ एप्रिल २००९
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं,
पाखरू बनून उंच उंच
तिला घेवून उडायलाच हवं...
तिच्या हस-या चेह-यावर जावू नका
अंतर्मनात जावून दुःख
एकदा तरी बघायलाच हवं,
अगदी मरण यातना सोसून
तिचा श्वास होवून जगायलाच हवं...
आयुष्याचा श्वास आहे ती
म्हणुन आयुष्य अजुन टिकून आहे,
तिलाही खुप त्रास होत असेल
केवळ तुम्हाला त्रास नको म्हणुन
ती हातचं काही राखून आहे...
असं प्रेम मिळणं हा
नशिबाचा एक भाग आहे,
ते मिळवण्यासाठी थोडं धडपडायलाच हवं,
त्यासाठी प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...
--------------------मनोज
३.०५.२००९
पाऊस...
एक दिवस
धो-धो कोसळणारा
बेभान पाऊस,
चिंब ती चिंब मी
तरी भिजवतोय पाऊस...
हातांचा हातांना
ओठांचा ओठांना
अजाणता स्पर्श,
जाणवला तिला
जाणवला मला
मनातल्या मनात
मनाला होतोय हर्ष...
मी कविता करतोय
ती गाणं गुणगुणतेय
जुगल बंदी सुरु आहे,
तो शांत कसा राहील
ढगातुन कडकडाट
गडगडाट विजांचा
पाण्याचं तान घेणंही सुरु आहे...
ती ही तिथेच
अन् मी ही तिथेच
जागा सोडून कुणी हलत नाही,
दिवस सरून
अंधारल्या रात्री
घरी तर जायचंय
पण पावलं मात्र चालत नाही...
असाच पाऊस नेहमी येत राहो,
भिजवून मनाला
चिंब करून जावो...
थकून भागुन शेवटी
निघून गेला पाऊस
त्याची घरी कुणी वाट पाहतंय,
माझ्यापाशी ती
तिच्यापाशी मी
कसले घर... आणि कुणाचे...?
आम्हाला दुसरं कुठे काय आठवतंय....
असाच पाऊस
नेहमी येत राहो,
भिजवून मनाला
चिंब करून जावो...
------------मनोज
१५।५।२००९
बरस रे मेघा...
वैशाख वणवा पेटला आहे
रानी-वनी या चोहीकडे,
पानं-फुलेही सुकली आहे
रौनक नाही कुणीकडे,,
बहराया हे वन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
आठवणी त्या पावसाळी
अंधुकशा तिच्या सवेच्या
चोर पावले होती भेटी,
जांभळीच्या झाडाखाली होती
तिच्या मनीच्या गुज-गोष्टी,,
मोहराया हे मन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
साद घालीत गडगड वाजीत
श्रावण कसा ऐटित आला
धुंद मनी ही कुंद हवा,
मनात भिनलाय स्पर्शाचा नाजुक गारवा,,
तरतराया हे तन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
वाट पाहुनी तिची
आज ती आलीये
सहवासाचे धन घेऊनी,
न जावो ती
विरहाचे दु:ख देऊनी,,
भरभराया हे धन पुन्हा
बरस रे मेघा...बरस...
--------------मनोज
१६।६।२००९
"माय" (आई)
थोडी पार्श्वभूमी- आपण नेहमी पहातो की, आदिवासी पाड्यात भूकबळी बहुधा मुलेच होत असतात। परंतु जर एखादी "माय" (आई) स्वत: भूकबळी होऊन मुलाला त्यातुन बाहेर काढत असेल तर अशा अंतिम क्षणी तिच्या मुलाच्या असणा-या भावना या शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न...आपल्या साद-प्रतिसाद, कौतुक आणि सुचना... सर्वांचेच यथेच्छ स्वागत आहे... तरी कळ्वावे...
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...
रणरणत्या उन्हात भलं मोठं वझं
डोक्यावर घेऊन चपलाबिगर चालत जाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं पयलं
तुह्या पोटात टाक माय...
लई-लई काम करती गं
जरा बी विश्रांती न्हाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...
मले लाज वाटाया हवी
तुह्या अदुगर मी हावरटावानी खाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...
खाल्ल्याबिगर एक मैल चालाया व्हत न्हाय
धा-धा मैल चालून तुह्ये दुखत न्हाही पाय...?
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...
अंथरूणाले खियली हाय आज
तरी बी कष्टंच करीत -हाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...
आज तरी या लेकरासाठी
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...
--------मनोज
२ जुलै २००९