Monday, July 13, 2009

"माय" (आई)

"माय" (आई)
थोडी पार्श्वभूमी- आपण नेहमी पहातो की, आदिवासी पाड्यात भूकबळी बहुधा मुलेच होत असतात। परंतु जर एखादी "माय" (आई) स्वत: भूकबळी होऊन मुलाला त्यातुन बाहेर काढत असेल तर अशा अंतिम क्षणी तिच्या मुलाच्या असणा-या भावना या शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न...आपल्या साद-प्रतिसाद, कौतुक आणि सुचना... सर्वांचेच यथेच्छ स्वागत आहे... तरी कळ्वावे...

भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...

रणरणत्या उन्हात भलं मोठं वझं
डोक्यावर घेऊन चपलाबिगर चालत जाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं पयलं
तुह्या पोटात टाक माय...

लई-लई काम करती गं
जरा बी विश्रांती न्हाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...

मले लाज वाटाया हवी
तुह्या अदुगर मी हावरटावानी खाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...

खाल्ल्याबिगर एक मैल चालाया व्हत न्हाय
धा-धा मैल चालून तुह्ये दुखत न्हाही पाय...?
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...

अंथरूणाले खियली हाय आज
तरी बी कष्टंच करीत -हाय,
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...

आज तरी या लेकरासाठी
भाकरीचं दोन-चार तुकडं
पयलं तुह्या पोटात टाक माय...

--------मनोज
२ जुलै २००९

No comments: