Tuesday, January 11, 2011

Dreams Designers

Tuesday, June 15, 2010

"सुहास शिरवळकर- असे आणि तसे"

नुकतंच काहि दिवसांपुर्वी वाचकांच्या मनावर अनंतकाळ रहस्यकथा आणि सामाजिक कादंब-यांच्या माध्यमातुन गारुड घालणा-या अनभिषिक्त सम्राट असलेल्या सुहास शिरवळकर म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सुशि. यांच्या आयुष्याच्या कॅन्व्हास मध्ये एकसारखे रंग भरणा-या मैत्री आणि वाचन विश्वातील काहि मंडळी लिखित आठवणींचा संग्रह असलेले "सुहास शिरवळकर- असे आणि तसे" हे पुस्तक वाचनात आले. एखाद्या लेखकाचं आत्मचरीत्र इतरांनी उलगडुन लिहावं असा प्रकार मात्र विरळच असतो. यातून सिध्द होते कि, अशा लेखकाचं संपुर्ण आयुष्य किती पारदर्शक असेल कि, प्रत्येकाने लिहितांना त्यांच्या गत आयुष्याबद्दल कुठेही तफावत आढळुन येत नाही. वाहत्या पाण्यासारखं स्वच्छ, नितळ असं आयुष्य जगणा-या सुशिंनी आपल्या हस-या स्वभाव विशेषामुळे असंख्य वाचकांना मित्र बनविले किंवा वाचकही आपोआपच सुशिंच्या गोतावळ्यात ओढले गेले. आजमितीस महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि छोट्या गावातुनही सुशिंचा चाहता वर्ग किती प्रमाणात पसरलेला आहे, याची गणतीच नाही. सुशि अथवा सुशि साहित्याची प्रसिध्दी दोन व्यक्तींच्या संभाषणातून अगदी सहजपणे तिस-या व्यक्तीकडे होत असते. आणि त्यातूनच दिवसागणिक नवीन जोडल्या जाणा-या या चाहत्यांना बहुतांश वेळा सुशि आज हयात नाहीत हे देखील जाणवत नाही किंबहुना ते जाणून घेण्याची इच्छादेखील दर्शवीत नाहीत, परंतू तरी देखील सुशि व साहित्यावर त्यांची राम-हनुमान या जोडगळी प्रमाणे नितांत भक्ती आणि प्रेम दिसून येते. खंत एवढी एकच कि, या रामरुपी सुशिंच्या सर्व हनुमानरुपी भक्तांना त्यांचे मुर्त आणि प्रत्यक्ष दर्शन मात्र कधीच होणार नाही, परंतू आनंद असाही वाटतो कि, फक्त मनात आठवण काढताच आणि काही क्षण डोळे मिटता हा देव आपला हसरा, तजेल चेहरा घेऊन दर्शनासह संभाषणास त्वरीत हजर असतो आणि म्हणतो," ब-याच दिवसांत निवांत वेळ मिळालाच नाही, चल आता भरपूर गप्पा मारुया..."

पानेच्या पाने कादंबरी भरभरुन लिहिणा-या लेखकांपासून ते एकही ओळ लिहु न शकणा-या सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांशीच बोलण्याचे औत्स्युक्य या माणसांत येते तरी कोठुन...? सतत नवनवीन माणसे जोडण्याच्या उपजत कलेची देणगी सुशिंना देणारा देणगीदार एकमेव परमेश्वरच...

अनेक रहस्यकथा, सामाजिक कादंब-या, कथा, सदर, बालवाड्मय, एकांकिका, कवितासंग्रह इतकं अमाप लेखन करुनही," अहो सुशि, तुमच्या वाचक मित्रांची भुक अद्यापही भागलेली नाहीये... तेव्हा तुमच्या दारा बुलंद, फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन या मानस पुत्रांसह असंख्य वाचक वर्ग तुम्हांला हाक मारतोय. निदान "ओ" तरी द्या आणि खोटं खोटं का असेना पण मन:शांतीसाठी "परत येतोय" एवढं तरी म्हणा...... म्हणाल ना...! वाट पहातो......

तुमच्या सवयीप्रमाणे पत्राचे उत्तर नक्कीच द्याल ही आशा आहे...

Wednesday, December 16, 2009

आगळ्या प्रेमाची वेगळी कहाणी...

आगळ्या प्रेमाची वेगळी कहाणी...

तिना मना जनम

एकाच वकताले झालता..

मायबाप म्हनलं,

सुगीचा वकत बी तवाच आलता...

शाया शिकाले आमी

संग संगच जायचो..

बुट्टि मारुन कधी

दिस दिसभर फिरायचो...

धाकलपनी आमी

नवरा-नवरी खेळायचो..

ती मनी नवरी

मी तिना नवरा रायचो...

तवाच मना मन मा

पयलं प्रेम खुललं..

पर म्या तिला कधी

आय लव यु नाय म्हनलं...

ती अन म्या यकदा

पिच्चरला गेलतो..

आय लव यु म्हनली

मी तर तवा पुरता मेलतो..

म्हनली, तु मना बंटी

अन् मी तुनी बबली हाय..

म्हनलं, बाप मारेल

जराशी सांभाळुनच राय...

"अरे येड्या, खोटं खोटं

पिच्चरचा डायलाग म्हनुन पायला..

मनातला किडा मात्र

शब्दाभवतीच घोळत रायला...

तिनी गाडि डिस्टिन्कशला

एका मार्काने अडली..

तवा मनी इकडं

पास व्हायची बोंब पडली...

पुढल्या शिक्षणासाठी ती

शहरामधी गेली..

खरं तर शादीची आशा

तवाच अर्धी मेली...

परत आली यकदा

कुनी साहेबही सोबत व्हता..

मले भेटाले उनती

पर मना गावामा ठिकाना नव्हता...

म्या येड्यागत आपलं

माळरानावर जाऊन बसलो..

प्रेम बिम म्हनत म्हनत

सोताच सोताशी फसलो...

शादी ले गेलो व्हतो तिच्या

आंदनात मनं मनच दिलं..

पर तवा बी तिले

आय लव यु नाय म्हनलं...

---------------मनोज

१८ नोव्हेंबर २००९

Wednesday, July 22, 2009

"दुनियादारी"

"दुनियादारी"
प्रिय वाचकहो,
"सु.शि." म्हणजेच सुहास शिरवळकर. कित्येक तरुण वाचकांचे एक आदर्शवादी लेखक. कारण ऐन तारुण्याच्या उंबरठयावर पाऊल ठेवणा-या प्रत्येक तरुणाला वास्तववादि "दुनियादारी" ला सामोरे जावे लागत असते आणि त्या उंबरठयावर असतांना काहि तरूणांना आयुष्यभराच्या वाटचालीसाठी योग्य वाट सापडते तर काहि हिच वाट चुकतात आणि कुठेतरी दुरवर भटकत जातात. याच वयात कॉलेज जिवनात लागणा-या वाईट संगती आणि सोबत, कुणाबद्दल तरी मनात वाटणारं आकर्षण किंवा प्रेमही खुलत असतं. अशा या प्रत्येक तरूण मनाच्या आयुष्यात येणा-या एका पर्वाला सु.शिं.नी आपल्या "दुनियादारी" या कादंबरीतुन इतक्या बखुबीपणे मांडले आहे की, त्याबद्दल कितीही बोलले तरी शब्द तोकडे पडतात. हा माझा स्वानुभव आहे की, दुनियादारीची थोडिशी कल्पना कुणाला दिली तर ऐकणा-याच्या मनात त्यासंबंधी प्रचंड कुतुहल व त्याचसोबत कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि त्यानंतर सुरु होतो दुनियादारीचा शोध. प्रातिनिधीक स्वरुपातल्या कादंबरीचा अथवा वास्तवातल्या दुनियादारीचा.
प्रत्येक मुलाच्या वा मुलीच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रीणी येत असतात. परंतु त्यांची व्याप्ती किती..? असे विचारले तर ते मात्र चटकन कुणाला काही ठरविता येत नाही. अशाच प्रकारे या कादंबरीतुन अजरामर झालेला एस.पी. चा कट्टा आणि त्या कट्ट्यावरची वरकरणी टवाळ दिसत असणारी " कट्टा गँग" मनातून किती प्रेमळ आणि मवाळ आहे याचं दर्शन घडते.
या कट्टयाचे सदस्य- दिग्या (डि.एस.पी), श्रेयस, अश्क्या,
उन्म्या, नित्या, मध्या, श्री, प्रितम पटेल.
मुली- शिरीन, मिनू, सुरेखा, आशा, पुष्पा.
विरोधी पण महत्वाचे- साईनाथ, शशिकला.
आणि या व्यतिरिक्त- एम.के.क्षोत्री, रानी मां, डॅडी, धिरुभाई.
सर्वच पात्रे कशी आपल्या सभोवताली सापडणारी आहेत. त्यामुळे ही दुनियादारी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. हे सारे कसे एकसंध आणि आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देणार असे गृहितक मांडुन चाललेले."शोधा म्हणजे सापडेल" अशी एक उक्ति आहे... त्याप्रमाणे थोडया वेगळ्या स्वरूपात बोलायचे झाले तर मी म्हणेल, " पहा म्हणजे सापडेल" आपल्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्ति मधे ही पात्रे इतकी सहजपणे सापडतात... की क्षणभर तुम्हाला स्वत:ला वाटते, आपण पण ही दुनियादारीच तर जगत नाही आहोत ना....!
"शिरीन" या अनुभवसंपन्न मुलीबद्दल काय बोलावे..? कादंबरीचा हर एक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही... तिचे एक वाक्य मनाला खुपच लवकर भिडते. ती म्हणते," आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते." या वाक्यातला खोलवर असलेला विचार शिरीनच्या मुखातून निघालेला असला तरी तो मुळात सु.शिं.च्या ह्रदयातुन आलेला आहे, हे विसरुन कसं चालेल...!
एम.कें.चं जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं ते दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलणं... रानी मां म्हणजेच पुर्वीच्या मीरा सरदेसाई चं दु:ख... हे सारं मनातुन काढुन कागदावर उतरविणारे आपले सु.शि.
दुनियादारीचं सार काढुन ती कोळुन प्यायल्यास क्वचित प्रसंगी आयुष्य जगतांना कुणाला काही त्रास होईल असे मला वाटते. अन्यथा या विचारांच्या आधारे स्वत:चं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ करुन घेण्यास प्रत्येक वाचकाला मदत होते.
तेव्हा अशी ही दुनियादारी प्रत्येकाने जपा, जगा. हीच एक अपेक्षा...

मित्रांनो, या कादंबरी वाचनाच्या निमित्ताने मला त्यावर सुचलेल्या काही ओळी...
"दुनियादारी"
दुनियादारी...
रानी मां मधील
गुढ एका आईची,
डॅडिंनी वाळीत टाकलेल्या
मुलाच्या नात्याची...

दुनियादारी...
मिनू की शिरीन...?
या पडलेल्या कोड्याची,
मोठा होऊन सुध्दा
"चाईल्ड" असणा-या श्रेयसची...

दुनियादारी...
चाकु, तलवारी, राडा
हे सारं सारं विसरुन,
प्रेमात, रांगड्या वाघाचं
मांजर झालेल्या दिग्याची...

दुनियादारी...
एका टोणग्यावर
मनसोक्त प्रेम करणा-या,
अण्णांच्या धाकामुळे
स्वप्न चुरगळणा-या सुरेखाची...

दुनियादारी...
भित्रा, घाबरट
दगाबाज अशा अश्क्याची,
अनुभव कोळुन प्यायलेल्या
प्रितम अन शिरीनची...

दुनियादारी...
मध्या, श्री, नित्या
या सा-यांच्या दोस्तीची,
हुशार अन हजरजबाबी
विनोदी कोडे घालणा-या उन्म्याची...

दुनियादारी...
संधी मिळताच गेम करणा-या
संधीसाधु साईनाथची,
वासनेपोटी माजलेल्या
गंडविणा-या शशीकलेची...

दुनियादारी...
लग्न म्हणजे पोरखेळ
समजणा-या मनीषची,
तर कॉलेजात शिकतांना
मास्तरवरच प्रेम करणा-या सुधेची...

दुनियादारी...
दु:ख दारुत बुडवून
तशीच पोटात रिचविणा-या,
भावनाशुन्य झालेल्या
महान अशा एक.के.क्षोत्रींची...

दुनियादारी...
वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या
चालत राहणारी,
सर्वांची आवडती
कधीही न संपणारी...

तुमची, आमची
दुनियादारी...
दुनियादारी...
दुनियादारी...

-----------मनोज