नुकतंच काहि दिवसांपुर्वी वाचकांच्या मनावर अनंतकाळ रहस्यकथा आणि सामाजिक कादंब-यांच्या माध्यमातुन गारुड घालणा-या अनभिषिक्त सम्राट असलेल्या सुहास शिरवळकर म्हणजेच आपले सर्वांचे लाडके सुशि. यांच्या आयुष्याच्या कॅन्व्हास मध्ये एकसारखे रंग भरणा-या मैत्री आणि वाचन विश्वातील काहि मंडळी लिखित आठवणींचा संग्रह असलेले "सुहास शिरवळकर- असे आणि तसे" हे पुस्तक वाचनात आले. एखाद्या लेखकाचं आत्मचरीत्र इतरांनी उलगडुन लिहावं असा प्रकार मात्र विरळच असतो. यातून सिध्द होते कि, अशा लेखकाचं संपुर्ण आयुष्य किती पारदर्शक असेल कि, प्रत्येकाने लिहितांना त्यांच्या गत आयुष्याबद्दल कुठेही तफावत आढळुन येत नाही. वाहत्या पाण्यासारखं स्वच्छ, नितळ असं आयुष्य जगणा-या सुशिंनी आपल्या हस-या स्वभाव विशेषामुळे असंख्य वाचकांना मित्र बनविले किंवा वाचकही आपोआपच सुशिंच्या गोतावळ्यात ओढले गेले. आजमितीस महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि छोट्या गावातुनही सुशिंचा चाहता वर्ग किती प्रमाणात पसरलेला आहे, याची गणतीच नाही. सुशि अथवा सुशि साहित्याची प्रसिध्दी दोन व्यक्तींच्या संभाषणातून अगदी सहजपणे तिस-या व्यक्तीकडे होत असते. आणि त्यातूनच दिवसागणिक नवीन जोडल्या जाणा-या या चाहत्यांना बहुतांश वेळा सुशि आज हयात नाहीत हे देखील जाणवत नाही किंबहुना ते जाणून घेण्याची इच्छादेखील दर्शवीत नाहीत, परंतू तरी देखील सुशि व साहित्यावर त्यांची राम-हनुमान या जोडगळी प्रमाणे नितांत भक्ती आणि प्रेम दिसून येते. खंत एवढी एकच कि, या रामरुपी सुशिंच्या सर्व हनुमानरुपी भक्तांना त्यांचे मुर्त आणि प्रत्यक्ष दर्शन मात्र कधीच होणार नाही, परंतू आनंद असाही वाटतो कि, फक्त मनात आठवण काढताच आणि काही क्षण डोळे मिटता हा देव आपला हसरा, तजेल चेहरा घेऊन दर्शनासह संभाषणास त्वरीत हजर असतो आणि म्हणतो," ब-याच दिवसांत निवांत वेळ मिळालाच नाही, चल आता भरपूर गप्पा मारुया..." पानेच्या पाने कादंबरी भरभरुन लिहिणा-या लेखकांपासून ते एकही ओळ लिहु न शकणा-या सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांशीच बोलण्याचे औत्स्युक्य या माणसांत येते तरी कोठुन...? सतत नवनवीन माणसे जोडण्याच्या उपजत कलेची देणगी सुशिंना देणारा देणगीदार एकमेव परमेश्वरच...
अनेक रहस्यकथा, सामाजिक कादंब-या, कथा, सदर, बालवाड्मय, एकांकिका, कवितासंग्रह इतकं अमाप लेखन करुनही," अहो सुशि, तुमच्या वाचक मित्रांची भुक अद्यापही भागलेली नाहीये... तेव्हा तुमच्या दारा बुलंद, फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन या मानस पुत्रांसह असंख्य वाचक वर्ग तुम्हांला हाक मारतोय. निदान "ओ" तरी द्या आणि खोटं खोटं का असेना पण मन:शांतीसाठी "परत येतोय" एवढं तरी म्हणा...... म्हणाल ना...! वाट पहातो......
तुमच्या सवयीप्रमाणे पत्राचे उत्तर नक्कीच द्याल ही आशा आहे...